
कोल्हापूर : गोकुळचे विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील आज संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत.

त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसात पूर्ण होईल. यापुढील दोन वर्ष अरुणकुमार डोंगळे यांना अध्यक्षपदी संधी दिली जाणार आहे.गोकुळ मध्ये तब्बल तीस वर्षानंतर आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने महाडिक गटाच्या सत्तेला सुरुंग लावत सत्तांतर घडवले.
सत्तांतरानंतर अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली. त्यावेळी आघाडीच्या नेत्यांनी विश्वास पाटील दोन वर्षांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देतील आणि पुढील दोन वर्षांसाठी अरुणकुमार डोंगळे यांना संधी देण्यात येईल, असे ठरले होते. यानुसार अध्यक्ष विश्वास पाटील यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आज गोकुळच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रकल्पस्थळी संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत.
