
कोल्हापूर: लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी सांगता कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व IT Association of Kolhapur यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Career Opportunities या सदरातील या विषयावर न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांचे तज्ञ मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. या व्याख्यानास कोल्हापुरातील आयटी क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक, प्राध्यापक वर्ग, नागरिक तसेच या क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी उपस्थित होते.

डाॅ. दाभोळे यांनी दैनंदिन जीवनातील सुलभ उदाहरणे देत AiML तंत्रज्ञानाचा भविष्यातील वापर कसा होईल याचे उपस्थितांना मार्गदर्शन केले. माणसातील नैसर्गिक बुद्धिमत्ता ही उपकरणे तसेच रोबोमध्ये कशा प्रकारे अंतर्भूत केली जाते आणि ती उपकरणे व रोबो अगदी माणसांसारखीच किंबहुना माणसांपेक्षा अधिक कार्यक्षमपणे व अथकपणे कसे कार्य करतील हे पटवून दिले. औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे सांगतानाच चौथ्या टप्प्यातील AiML तंत्रज्ञानाचे योगदान त्यांनी विशद केले. सद्ध्याच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरसाठी हे तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या क्षेत्रातील नोकरी-व्यवसायाच्या सद्ध्याच्या व भविष्यातील संधी त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. यासाठी विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरींग पातळीवर आपल्या आवडीनुसार मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा मुलभूत शाखेतून शिक्षण घेवून पुढे पदवी घेताना AiML, Automation, Robotics अशा शाखेतून शिक्षण घेणे श्रेयस्कर ठरेल असे ते म्हणाले. शिवाय, AiML, IoT आदी तंत्रज्ञानाचे शाॅर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्याख्यानामुळे AiML तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात होतो हे समजले आणि या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनुषंगाने योग्य माहिती व दिशा मिळाली असे उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले.
