
बुलढाणा : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते बुलढाण्यात फिरकलेच नाहीत.त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी बुलढाण्यातील गावागावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावले आहेत. शोधून देणाऱ्यांना पैसेही जाहीर केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये सध्या या पोस्टर्सची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. पोस्टरवर गुलाबराव पाटील यांचा फोटो आहे. त्यावर पालमंत्री बेपत्ता असं लिहिलं आहे. तसेच शोधून देणाऱ्यांना 51 रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपर्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी स्वत:चं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. गावागावातील नाक्यानाक्यावर, चहा आणि पान टपऱ्यांवर हे पोस्टर्स लावले आहेत. हे पोस्टर्स पाहण्यासाठी गावागावात झुंबड उडाली असून नाक्यावर, चहाच्या टपऱ्यांवर, चावडीवर आता या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
