पाऊस कमी पडला किंवा लांबला तर दूधगंगा, वेदगंगा काठच्या शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल : आमदार हसन मुश्रीफ यांची चिंता

कोल्हापूर :काळमवाडी धरणाची गळती काढणार म्हणून सहा टीएमसी पाणी सोडले. धरणात केवळ सहा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. परंतु; आजतागायत इस्टिमेट झालेले नाही, निधीचीही तरतूद नाही, अशी माहिती आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिली. तीव्र उन्हाळा व अल- निनोच्या संकटामुळे पाऊस कमी पडल्यास दूधगंगा व वेदगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. याला पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारीच सर्वस्वी जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले दरम्यान; परमेश्वराच्या कृपेने जर दोन ते तीन चांगले वळीव बरसले आणि देवाच्या आशीर्वादाने मान्सून वेळेत सुरू झाला तरच या संकटातून आपण वाचू शकू, असा आशावाद, त्यांनी व्यक्त केला.

आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याच्या निमित्ताने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला विचारले होते. यावर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये गळती काढावीच लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यासाठी सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार होते. तरीसुद्धा कळम्मावाडी क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, अशी भूमिका त्यावेळी त्यांनी घेतलेली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना मी सांगितले होते, “की गळती काढण्याची सर्व तयारी झाली असेल तरच पाणी सोडा. अन्यथा; पाणी सोडू नका.” त्याप्रमाणे कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांनी त्याप्रकारचे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले. मुश्रीफ पुढे म्हणाले, त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेघोलीसारखे झाले तर त्याची जबाबदारी तुमची राहील, असे कळविले. त्यामुळे हे अधिकारी घाबरले, त्यांनी सहा टीएमसी पाणी सोडले. गळती काढण्याचे काम होणार होते, पण इस्टिमेट झालेले नाही. निधीची तरतूद नाही. सहा टीएमसी पाणी सोडल्यानंतर आज आपल्या धरणामध्ये फक्त सहा टीएमसी पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्याचा चटका जोरात आहे. एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. आता माझ्या मनामध्ये एकच शंका आहे, हा उन्हाळा अतिशय तीव्र आहे. तसेच, हवामान शास्त्रज्ञांच्या भाकितानुसार अल -निनोचे संकटामुळे पाऊस कमी पडणार आहे. दुर्दैवाने हे होऊ नये, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पाऊस जर लांबला, कमी पडला तर दुधगंगा व वेदगंगा नदीकाठच्या लोकांना फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यांची संपूर्ण जबाबदारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर राहील.

🤙 8080365706