
कोल्हापूर : फुलंब्री पंचायत समिती मध्ये गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी 31 मार्च 2023 रोजी केलेल्या आंदोलनाबाबत जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आज बुधवारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना निवेदन दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे ३१ मार्च रोजी पंचायत समिती फुलंब्री परिसरात सरपंच मंगेश साबळे यांनी गळयात पैश्याच्या माळा घालून दोन लाख रुपये पंचायत समिती परिसरात फेकल्याची चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल झाली. ज्यात त्यांनी गट विकास अधिकारी, तसेच पंचायत समितीतील इतर अधिकारी/कर्मचारी हे पैशाची मागणी करित आहेत असा दावा केलेला आहे. तसेच काही वृत्त वाहिन्यांवर मंत्री ग्रामविकास व पंचायतीराज यांनी याबाबत संबंधित गट विकास अधिकारी श्रीमती ज्योती कवडदेवी यांचे निलंबन केल्या बाबतच्या बातम्या सुध्दा दिसून येत आहे. असे या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर संबंधित गट विकास अधिकारी विहीरी मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केल्या बाबतचा आरोप संबंधित सरपंच यांनी केल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी या दरम्यान पैशाची माळ गळयात घालून दोन लाख रुपये पंचायत समिती परिसरात फेकलेले स्पष्ट पणे दिसून येत आहे. संबंधित ग्राम पंचायत मध्ये मागील कालावधीत १ कोटी रुपयांची काम मग्रारोहयो योजने अंतर्गत करण्यात आलेली आहे. तसेच सध्या स्थितीत २८ विहीरींची कामे प्रगतीपथावर आहेत. संबंधित सरपंच यांनी ८ मार्च २०२३ रोजी ९ विहीरींचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. तसेच या प्रस्तावात काही त्रुटी आहेतृ त्यामुळे त्यांचे म्हणण्यात तथ्य नाही असे संघटनेमार्फत निदर्शनास आणून देऊ इच्छितो.संबंधित सरपंच यांनी याबाबतीत काही अडचण असल्यास नियमानुसार ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा इतर वरिष्ठ अधिकारी यांचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. पैशाची मागणी केल्यास संबंधित सरपंच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुध्दा दाद मागू शकत होते.परंतु त्यांनी असे काहीही न करता जाणीवपूर्वक (स्टंटबाजी) दिखावा करुन संबंधित गट विकास अधिकारी यांचेवर दबाव टाकणे तसेच सवंग लोकप्रियता मिळवून प्रसिध्द होण्यासाठी हा प्रकार केल्याचे दिसून येते. या प्रकरणामुळे संबंधित महिला गट विकास अधिकारी यांची सामाजिक बदनामी झालेली आहेत तसेच त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे.
संबंधित महिला अधिकारी या घटनेपासून प्रचंड मानसिक तणावाखालील आहेतृ याबाबतीत पोलीस स्थानकात गुन्हा सुध्दा नोंदविण्यात आलेला आहे. संबंधित सरपंच यांनी भारतीय चलनाचा अवमान केल्याचे सुध्दा दिसून येते. संबंधित सरपंच यांचे फेसबुक चे खाते पाहता त्यांनी यापूर्वी सुध्दा अशाच पोस्ट दिसून येत आहे. इतर विभागातील अधिकारी (पोलीस, महसुल, कृषि इत्यादी ) यांचा सुध्दा संबंधित सरपंच यांचे बाबतीतील अनुभव कमी अधिक प्रमाणात असाच असल्याचे ऐकीवात आहे. महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी आणि प्रशासकीय दृष्टया पुढारलेल्या राज्यात एका महिला अधिका-यासोबत अशी घटना होणे ही निंदनीय बाब आहे. याप्रकरणामुळे प्रशासनाची नाहक बदनामी झालेली आहे.अधिका-यांकडून या सर्व बाबीचा विचार करता संबंधित सरपंच यांनी प्रशासकीय शिस्तीचा सामाजिक संकेतांचा व नैतिकतेचा भंग केल्याचे संघटनेचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे या प्रकरणाची जि.प.च्या वरिष्ठ चौकशी करुन संबंधित सरपंच यांच्यावर अपात्रतेबाबत तसेच इतर कठोर पोलीस कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाचे अधिकारी यांना दयावेत. अशी संघटनेची आग्रही मागणी आहे. तसेच मंत्र्यांनी प्रसार माध्यमांवर संबंधित गट विकास अधिकारी यांना निलंबित करण्यात आल्याच्या बातमीबाबत सुध्दा संघटना आपले लक्ष वेधू इच्छिते की, संबंधित गट विकास अधिकारी यांचेवर कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी या प्रकरणांची चौकशी केली जावी आणि त्यात दोषी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करावी अशी संघटनेची रास्त व आग्रहाची मागणी आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन दोष सिध्द होईपर्यत त्यांनी निलंबित करु नये. कोणतीही चौकशी न करता कार्यवाही करणे हे नैसर्गिक न्यायाचे तत्व तसेच प्रशासकीय नियम यांच्याशी विसंगत अशी बाब ठरेल. त्यामुळे या प्रकणांची चौकशी करावी आणि तद्नंतर दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी अशी संघटनेची आग्रही मागणी आहे.वरील प्रकरणात उचित कार्यवाही न झाल्यास.म.वि.से. संघटनेतर्फे दिनांक १० एप्रिल २०२३ पासून नरेगाचे काम बंद करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनीषा देसाई, तसेच गटविकास अधिकारी शिरोळ शंकर कवितके, शाहूवाडी रामदास बधे, राधानगरी संदीप भंडारे, कागल सुशील संसारे ,गडहिंग्लज शरद मगर, हातकणंगले शबाना मोकाशी ,आजरा दाजी दाईगडे, चंदगड चंद्रकांत बोंडरे, गगनबावडा माधुरी परीट ,करवीर विजय यादव, भुदरगड शंकर गावडे ,पन्हाळा सुभाष सावंत आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
