
कोल्हापूर : गगनाला भिडणाऱ्या उंचच्या उंच सासन काठ्या हलगी,पिपाणी सनईच्या तालावर सासनकाठ्या नाचवणारे भाविक ,गुलालात न्हाऊन गेलेले भक्त अशा अनोख्या वातावरणात व जोतिबाच्या नावानं चांगभलं नावाचा गजर करीत दख्खनचा राजा श्री जोतिबाचे पाच लाखाहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले.
आज यात्रेचा मुख्य दिवस असला तरी काल मंगळवार पासून मानाच्या सासन काठ्या डोंगरावर दाखल झाल्या होत्या.भाविकांचे जत्थेच्या जत्थे डोंगरावर येत होते. एसटी महामंडळाने 150 बसची सोय केली होती.जोतीबावर येण्यासाठी केरली मार्गे तर परतण्यासाठी वाघबीळ मार्गे एकेरी वाहतूक ठेवली होती.श्री चे दर्शन घेण्यासाठी यंदा दर्शन मंडपातून प्रवेश दिला जात होता.उन्हाची तमा न बाळगता गुलालाने न्हाऊन हलगी ढोलाच्या तालावर भाविक सासन काठ्या नाचवत होते.जोतिबा डोंगर भाविकांनी गजबजला होता.पहाटे 3 वाजता महा घंटेच्या निनादात यात्रा सोहळ्यास प्रारंभ झाला.पहाटे 4 वाजता काकड आरती व मुखमार्जन झाल्यानंतर 5 वाजता पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांच्या हस्ते श्री जोतिबास महाअभिषेक घातला.त्यानंतर राजेशाही थाटातील सुवर्ण अलंकारातील महापूजा महादेव, नंदी, चोपडाई,रामलिंग दत्त ,काळभैरव देवास महाअभिषेक घालण्यात आला.दीड वाजता पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांची पूजा करण्यात आली.
यावेळी जोरदार गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली.सुमारे 5 लाख भाविकांनी या यात्रेत उपस्थिती लावली. डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव होता.
