
अदमापूर : बाळूमामा देवालय अदमापुर येथील वादग्रस्त अशा ट्रस्टी निवडी अखेर झाल्या आहेत.बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापुरच्या कार्याध्यक्षपदी देवालय समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांची निवड करण्यात आली असून अन्य पाच जणांना ट्रस्टी म्हणून घेण्यात आले आहे.
या निवडी नियमाला धरून केल्या आहेत. या निवडी प्रसंगी विरोध करणारे ट्रस्टी उपस्थित होते. त्यानी प्रोसिडिंगवर सह्या केल्या आहेत, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये धैर्यशील भोसले यांनी अधिकृत प्रोसिडिंग यावेळी पत्रकारांना दाखवले. जर कार्याध्यक्ष पदासाठी विरोधच होता, तर त्यावेळी त्यांनी सह्या का केल्या? असा सवाल करीत भोसले म्हणाले, दि. 18 जानेवारी 2023 रोजीच्या मिटिंगमध्ये आदमापुर गावातील दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, यांना नवीन ट्रस्टी म्हणून घेण्याची मान्यता यांनीच दिली आहे. केवळ ही मंडळी आदमापूर गावातील आहेत म्हणून यांचा विरोध सुरू आहे, असा सवाल ही त्यांनी केला. याबाबत आदमापुर ची जनताच योग्य निर्णय घेईल अशी समजही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना रामचंद्र पाटील म्हणाले, ग्रामस्थांना देवालय समितीवर ट्रस्टी म्हणून घेण्याबाबतचा सर्व ठराव एका नामांकित वकिलाच्या समोर झाला असून विद्यमान सचिव रावसाहेब कोणकिरी यांनी यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थ व नूतन ट्रस्टी यांचे अभिनंदन करून बाळूमामा चा भंडारा लावून पेढे बनवण्याचे काम केले होते. त्याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. जर हे ग्रामस्थांनाच डावलत असतील तर कुणाच्या जोरावर, मदतीने इथून पुढे बाळूमामांच्या मंदिराचा कारभार पाहणार आहेत याबाबत शंका निर्माण होत आहेत.आदमापुरचे सरपंच विजय गुरव हे या दोन्ही मिटींगच्या वेळी गैरहजर होते. त्यांना या संदर्भात रीतसर मीटिंग नोटीस दिली होती. पण ते मिटींगला गैरहजर होते. जे विजय गुरव बाळूमामा देवालयामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप करत आहेत, ते या देवालयाच्या ट्रस्टीमध्ये पदसिद्ध सदस्य आहेत. याचा त्यांना विसर पडलाय की काय आणि ते देवाची नाहक बदनामी का करत आहेत? असा सवाल ग्रामस्थांनी करून त्यांच्या या प्रवृत्तीचा या पत्रकार परिषदेच्या वेळी जाहीर निषेध केला.यावेळी देवस्थानचे विश्वस्त संभाजी पाटील, शिवाजी खतकर यांनीही मनोगत व्यक्त करत काल घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत देवस्थानचा कारभार पारदर्शक असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचं त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, बजरंग दूध संस्थेचे चेअरमन यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, संदीप मगदुम, इंद्रजित खर्डेकर, दिलीप पाटील, डॉ. संताजी भोसले, युवा नेते नामदेव पाटील आदी उपस्थित होते.
