कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीसाठी आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा अर्ज.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीची 2023-2028 सालाकरिता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाजार समिती प्रशासकीय कार्यालयामध्ये अनेक राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींची झुंबड उडाली आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी मोजक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसहित अनुसूचित जाती जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्याकडे सादर केला.

हा अर्ज दाखल करत असताना. उत्तमदादा कांबळे म्हणाले की, प्रस्थापित पक्षांनी छोट्या पक्ष संघटनांचा फक्त वापर करून घेतला तसेच हक्क आणि अधिकार मिळून सुद्धा दलित, श्रमिक आणि कष्टकरी वर्गाला न्याय देणारा कार्यकर्ता कधीही सहकारात प्रतिनिधी म्हणून घेतला नाही. मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही समविचारी पक्ष- संघटनेच्या माध्यमातून लढवली होती त्यामध्ये काही फरकाने पराभव झाला परंतु न डगमगता आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सहकारात जाऊन शेतकरी,कष्टकरी वर्गाला न्याय देण्याची भूमिका घेऊ शकतो. यासाठीच या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा प्रतिनिधी बनून शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या कष्टाला न्याय देण्याचं काम मी करेन याच भावनेतून हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. हा उमेदवारी अर्ज भरत असताना रिपाईचे राज्यसचिव मंगलराव माळगे, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, कागल तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर, सचिन मोहिते ,अभिजीत कोगले, सचिन कोनवडेकर, अतुल सडोलीकर, सागर कांबळे यांसहित अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706