
मुबंई : राज्यभर सध्या हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत; पण जगातील सर्वांत शक्तिशाली नेता पंतप्रधानपदी असताना हिंदूंना जनआक्रोश का करावा लगतोय, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ जाहीर सभा झाली.मविआच्या नेत्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीकेचे लक्ष्य बनविले. सर्वांत आक्रमक भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, सध्या कोंबड्या झुंजविण्याचे उद्योग सुरू आहेत. निवडणुका आल्याने जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जाताहेत, सावरकरांच्या नावे यात्रा काढली जातेय. सावरकरांबद्दल आम्हाला आदर आहेच; पण तुम्हाला खरेच प्रेम असेल तर सावरकरांना भारतरत्न देण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
