
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये, रविवारी संध्याकाळी हुगळी जिल्ह्यातील रिशरा येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर तिथली परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने कर्फ्यु लावण्यात आला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून इंटरनेटही बंद ठेवण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमीनिमित्त रिश्रा पोलीस स्टेशन परिसरात दोन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. दुसऱ्या मिरवणुकीवर जीटी रोडवरील वेलिंग्टन ज्यूट मिल इथे कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचं रुपांतर हिंसाचारात झालं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यामध्ये काही पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
