
आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना उद्या पोलाईट क्रिकेट क्लब, सांगली विरुद्ध कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब, कोल्हापूर यांच्यात खेळला जाणार आहे.
उपांत्य फेरीतील पहिला सामना भिडे स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध पोलाईट क्रिकेट क्लब सांगली यांच्यात खेळला. पोलाईट क्लब ने प्रथम फलंदाजी करताना १२५ धावा केल्या. त्यात ओंकार यादवने नाबाद ५१ धावांची खेळी केली तर मिहीर देवपूजेने तीन बळी घातले. भिडे स्पोर्ट्सचा पूर्ण संघ १७ षटकात ७२ धावात गारद झाला. पोलाईट संघाने ५३ धावांनी विजय मिळवत, अंतिम फेरीत प्रवेश केला. चार बळी घेणारा सांगलीचा सागर कोरे सामनावीरचा मानकरी ठरला.
उपांत्य फेरीतील दुसरा सामना कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब विरुद्ध सागरमाळ क्रिकेट क्लब यांच्यात खेळला. मोगणे संघाने प्रथम फलंदाजी करताना १११ धावा केल्या. त्यामध्ये भरत पुरोहितने ४१ धावा केल्या तर विश्वजीत जगतापने तीन बळी घेतले. उत्तरादाखल सागरमाळ क्रिकेट क्लबचा सर्व संघ ७० धावात गारद झाला. त्यामध्ये प्रणय अरमार करणे १६ धावा केल्या तर विकास जाधवने तीन बळी घेतले. मोगणे संघाने ४१ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. भरत पुरोहित सामनावीरचा मानकरी ठरला.पोलाईट क्लब, सांगली विरुद्ध कै. मोगणे क्लब, कोल्हापूर यांच्यातील अंतिम सामना उद्या (दि.२) दुपारी दीड वाजता शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर होणार आहे. तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
