
कोल्हापूर : काल शहरभरात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी बॅनरबाजी झाली.याची जबाबदारी आम आदमी पक्षाने स्वीकारली आहे. एखादी अतिरेकी संघटना ज्याप्रमाणे आपल्या कृत्याची कबुली देते अशीच पद्धत या संघटनेची आहे. अशा कुरापती करायला या संघटनांना पैसा कुठून येतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर अशा संघटनांना बळ कुठून मिळते, देशाबाहेरील विघातक शक्तींचा यामागे हात आहे का ? याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे यांनी शिष्टमंडळासह जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
यावेळी राहुल चिक्कोडे म्हणाले,भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभर विचारांची विकृती असणारे आंदोलन सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून काल कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आली व पत्रकार परिषद घेऊन या पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई यांनी स्वत:ची वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिलेली आहे.यामुळे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी , अशी मागणीही चिक्कोडे यांनी यावेळी केली केली.
त्याचबरोबर या निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टीच्यावतीने पोलीस प्रशासनास सूचित करण्यात आले कि अशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांचा बदनामी करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही. तसेच यापुढेही त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अशीच राहिल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील.यावेळी सरचिटणीस दिलीप मैत्राणी, हेंमत आराध्ये, उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, संतोष भिवटे, नाना कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, सुनील चव्हाण, दिग्विजय कालेकर, रवींद्र मुतगी, रमेश दिवेकर, आशिष कपडेकर, विजय खाडे, गायत्री राऊत,यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
