
कुडीत्रे : खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच पदासाठी निवडणूक होऊन तृप्ती संजय पाटील यांना ८ तर सत्ताधारी गटाच्या संगीता आनंदा कांबळे यांना ७ मते मिळाली. यामुळे निवडणूक अधिकारी बहुमताच्या आधारे शिवसेनेच्या तृप्ती पाटील यांची सरपंचपदी निवड झाली.
ठरलेल्या फॉर्म्युल्या प्रमाणे सरपंच दिपाली जांभळे यांनी राजीनामा दिला होता. शुक्रवार (दि.३१)रोजी काँग्रेसच्या तुकाराम पाटील गटाकडून निवडून आलेल्या अमर पांडुरंग कांबळे व वनिता देवदास कांबळे यांना आपल्या गटात सामिल करण्यात शिवसेनेला यश आले.शुक्रवारी सरपंच पदासाठी शिवसेनेच्या गटाकडून तृप्ती संजय पाटील तर काँग्रेसच्या संगिता आनंदा कांबळे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. यावेळी गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले. यात तृप्ती पाटील यांना ८ तर संगीता कांबळे यांना ७ मते मिळाली. बहुमताच्या आधारावर निवडणूक अधिकारी अनिल काटकर यांनी तृप्ती पाटील यांची सरपंच पदी निवड जाहीर केली. यानंतर संजय पाटील गटाने जल्लोष केला.
