
कोल्हापूर : शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी शहर अभियंता पदावरून उचलबांगडी करण्यात आली. सरनोबत यांच्याकडून शहर अभियंता पदाचा कार्यभार काढून घेऊन जल अभियंतापदाचा पूर्णवेळ कार्यभार सोपविण्यात आला. तर जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.
खा. शिंदे 26 मार्च रोजी कोल्हापुरात दौर्यावर आले असता शहरातील खड्ड्यामुळे ते चांगलेच वैतागले होते. त्यानंतर शासन स्तरावर सूत्रे हलली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरातील रस्त्यांच्या खड्ड्यासंदर्भात प्रधान सचिवांकडे केलेल्या तक्रारीमुळेच सरनोबत यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. बदलीमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.खड्ड्यामुळे कोल्हापुरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी केलेले रस्तेही खराब झाल्याने नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत असलेला दिसत आहे.नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी मंगळवारी सरनोबत यांच्याकडे जल अभियंतापदाचा कार्यभार सोपवून शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार आपल्या स्तरावर इतरांकडे सोपवावा, असे पत्र महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना पाठविले आहे. त्यानुसार डॉ. बलकवडे यांनी तडकाफडकी सरनोबत यांची जल अभियंतापदी बदली करून घाटगे यांच्याकडे शहर अभियंतापदाचा कार्यभार दिला. नेत्रदीप सरनोबत हे नोव्हेंबर 2006 पासून शहर अभियंतापदी कार्यरत आहेत.
