
कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, पन्हाळा येथे महाराणी ताराराणी यांच्या नावाने मुलींसाठी मिलिटरी स्कूल, कुस्ती पंढरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल बांधण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
रंकाळा संवर्धनाबरोबरच कोल्हापूरचा इतिहास उलगडणारा लेझर लाईट शो, कोल्हापूरसाठी दर्जेदार रस्ते, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत शिंदे यांनी राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना सूचना केली. कुस्ती, फुटबॉल स्पर्धेसाठी तसेच कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शिवसेना शहर कार्यालयात बोलताना शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बैठकांची आम्हाला चिंता नाही. त्याऐवजी आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहोत. आमचे कामच बोलेल”शिंदे म्हणाले, “कोल्हापूर हे अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. त्यातील एक फुटबॉल आहे. खेळाडूंना चांगल्या स्टेडियमची गरज आहे.
शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम बांधले जावे, याची काळजी मी घेईन. तसेच सुसज्ज कुस्ती संकुल बांधले जाईल.” दरम्यान खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी दुपारी जिल्ह्यातून प्रचंड संख्येने सर्व क्षेत्रातील संस्था तसेच नागरिक, व्यापारी प्रश्न, अडचणी घेऊन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना भेटले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले. अनेक प्रश्नांचा निपटारा त्यांनी जागेवरच लावला. कोल्हापूरला खंडपीठ होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी खंडपीठ कृती समितीला दिले.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. डॉ. जयसिंगराव पवारांच्या आग्रहास्तव, करवीर राज्याची सत्ता असलेल्या पन्हाळा येथे मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. महाराणी ताराराणी यांच्या नावाने राज्य सरकार मार्फत यापुढे पुरस्कार देण्याबाबत आपण पुढाकार घेऊ, महाराणी ताराराणी चरित्र ग्रंथ सर्वांपर्यंत पोचवू, चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास जगापर्यंत नेला जाईल, असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर जयसिंगराव पवार यांना दिले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमित कामत, सीए सुशांत फडणीस, इतिहास संशोधक वसुधाताई पवार, डॉक्टर मंजुश्री पवार, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे आदी उपस्थित होते.
