
कोल्हापूर : राहुल गांधींची खासदारकी रद्द केली जाणं म्हणजे देशाची हुकूमशाही कडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आणि आ.सतेज पाटील यांनी केली आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द केली जाणे यावरूनच केंद्र सरकार राहुलजींना किती घाबरते हे लक्षात येते. त्यांची खासदारकी रद्द केली तरी जनतेचा आवाज संसदेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. या देशातील जनता यापूर्वीही राहुलजींसोबत होती, आजही आहे आणि यापुढील काळातही त्यांच्यासोबत राहील याची खात्री आहे. लोकशाहीची तत्वे पायदळी तुडवणाऱ्या भाजप सरकारने जनता हे कृत्य विसरणार नाही हे लक्षात ठेवावे, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.पुढे बोलताना ते म्हणाले,सर्वसामान्य भारतीयांचा आवाज बनलेल्या राहुल गांधी यांचा भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला जनता योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. देशात सुरू असणारी ही हुकूमशाही लोक खपवून घेणार नाहीत.
आम्ही सर्वजण राहुलजी गांधी यांच्यासोबत आहोत त्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा लढा आम्ही लढणार आहोत. जे लोक सत्याची बाजू घेतात, त्यांना बाजूला करण्याचं काम हे नेहमीच भाजपकडून होत आहे. पण याला आता जनताच उत्तर देईल.जनता पक्षाने लोकसभेतून बाजूला केल्यानंतर इंदिराजी गांधी यांनी थेट भारताच्या पंतप्रधान म्हणून संसदेत प्रवेश केला होता हा इतिहास आहे. आणि भाजपने केलेली हुकूमशाही पाहता इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे निश्चित आहे.
