वन्यजीवांचा आर्तनाद : दाजीपूर ते राधानगरी वाहतूक मार्गात बदल

देवगड: देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२३ दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिले आहेत.

दाजीपूर ते राधानगरी रस्ता हा संपूर्ण रस्ता राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून जातो. या रस्त्याचे रूंदीकरण अनिवार्य आहे आणखीन ते थांबवने आता अशक्य आहे. वरील संपूर्ण कामांच्या पुर्तते नंतर या रस्त्यावरून होणारी वाहतुक अधिक गतिशील होईल आणि या वाढत्या वेगामुळे या रस्त्यांवर होणाऱ्या वन्यजीवांच्या अपघातात निश्चितच वाढ होणार आहे.आधीच दरवर्षी या रस्त्यांवर पावसाळ्यात आणि नंतर लगेचच हिवाळ्यात शेकडो प्रजातींचे असंख्य लहान मोठे जीव वाहनांखाली चिरडले जातात व मृत्युमुखी पडतात. यात प्रामुख्याने साप, बेडूक, किटक यांचा समावेश असतो. वाहनांच्या धडकेने गवा, सांबर, साळींदर इ वन्यप्राणी देखील जखमी वा मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी आहेत. या अधिकच्या वेगामुळे या अपघातांची पर्यायाने वन्यजीवांची हत्या खुपच वाढणार आहे.राधानगरी-दाजीपूर हा रस्ता राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या बरोबर मधून जातो जो या अभयारण्याचे दोन भाग करतो. दक्षिणेकडे काळम्मावाडी धरण आणि त्याचे पाणलोट क्षेत्र आहे तर उत्तरेकडे राधानगरी धरण आणि त्याचे पाणलोट क्षेत्र आहे. वन्य प्राणी या दोन्ही क्षेत्रा दरम्यान नेहमीच ये-जा करत असतात, या मध्ये गवे-वाघा सारखे मोठे वन्यजीव तर आहेतच पण असंख्य लहान लहान प्राणी, सरीसृप, उभयचर, किटक सुद्धा ये-जा करतात. या सर्व जीवांना हा रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते पैकी बर्‍याच जीवांना आपला जीव गमवावा लागतोय. सद्या असलेल्या रस्त्याखालून अनेक ओढे जातात त्या ओढ्यांवर पुल व मोऱ्या बांधलेल्या आहेत. पैकी एक दोन पुल सोडले तर बहुतांश ठिकाणी नळे घातलेले आहेत पैकी बरेच नळे हे ओढ्याच्या तळापासून खुप उंचावर घातलेले आहेत जे अत्यंत चुकीचे आहे.या रस्त्याच्या रुंदीकरण दौरान या पुलांचे काम पुन्हा होणार असेल तर ते सर्व पुल आर्क पद्धतीने बांधावे नळे बिल्कुल घालू नयेत. आर्क पद्धतीने बांधलेल्या पुलांखालून पावसाळ्यात पाणी विना अडथळा जात असते. पावसाळ्यात अनेक प्रजातींचे मासे या ओढ्यातून वरच्या भागात प्रजननासाठी येतात. त्याच प्रमाणे सिसीलीयन सारखे उभयचर, असंख्य बेडूक या ओढ्यांचा वापर करत असतात. या रस्त्याच्या दक्षिणेकडे इदरगंज सारखी मोठी पठारे आहेत. अनेक प्रजातींचे सिसिलियन, इल मासे, खेकडे इ इ प्रजननासाठी या सड्यांवर सरपटत जातात. अश्या वेळी यातील असंख्य जीव वेगवान गाड्यांखाली चिरडले जातात. जर या ओढ्यांत नळे घातले गेले तर या जीवांच्या प्रजनन काळातील स्थलांतर मार्गात अडथळा निर्माण होऊन अनेक माशांच्या प्रजाती या नामशेष होतील वा त्यांच्या संखेत मोठी घट होईल. तसेच या आर्क पद्धतीच्या पुलांखालून पावसाळा वगळता इतर सर्व ऋतुं मधे जेव्हा यातील बहुतांश ओढे कोरडे पडतात तेव्हा अनेक वन्यजीव अगदी वाघ-गवे सारखे मोठे प्राणी देखील सहजा सहजी रस्त्याच्या दोन्ही बाजूस बिनधास्त ये-जा करू शकतील.

वन विभागाने त्याच्या हद्दीतील ओढ्यांवर आर्क पद्धतीचेच पुल बांधण्याचा आग्रह करावा किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर जेथे जेथे वन विभागाच्या हद्दीतील ओढ्यांवर पुल बांधण्याबाबत प्रस्ताव असेल तेथे तेथे आर्क पद्धतीचेच पुल मंजुर करावेत अन्यथा त्यास परवानगी बिल्कुल देऊ नये.आर्क पद्धतीचे पुल बांधने खर्चीक असेल वा या रस्त्यापुरते बोलायचे झाल्यास आत्ता हे अशक्य असलेस जे नळे घालण्यात येणार आहेत ते खुप मोठे असावेत. आणखीन ते नळे ओढ्यात अगदी तळाशी घालण्यात यावेत जेणेकरून पाणी विना अडथळा वाहत राहिल व माश्यांच्या प्रवासात काहीही अडचण येणार नाही. या रस्त्यावर उगवाई मंदिर जवळपास राधानगरी धरणाचे पाणी अगदी रस्त्यालगतच आहे त्यामुळे तेथे वन्यजीव रस्त्यांवर येण्याचे प्रमाण खुप आहे. शेळप, मांडरेवाडी या ठिकाणी रस्त्याकडील जंगल घनदाट आहे तेथे हमखास प्राणी रस्त्यांवर येतात. या ठिकाणी पुलांबाबत जागरूक रहाण्याची गरज अधिक आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता मी वन विभागाला आणि रस्ता बांधकाम विभागास विनंती करतो की त्यांनी या बाबतीत गांभीर्याने विचार-विमर्श करावा आणि योग्य ती पाऊले उचलावीत जेणेकरून भविष्यात होणाऱ्या वन्यजीवांच्या हत्या कमी होतील.कोल्हापुरातील खासकरून राधानगरतील सर्व निसर्गप्रेमींना मी आवाहन करतो की त्यांनी देखील आपापल्या परीने यात लक्ष घालावे आणि योग्यतम कामासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती कोल्हापुर वन्यजीव अभ्यासक फारूक म्हेतर यांनी केली आहे.

🤙 8080365706