
कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.या निवडणुकीत पारंपरिक राजकीय विरोधक आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील विरुद्ध माजी आ.महादेवराव महाडिक यांच्यात असणारी राजकीय झुंज पुन्हा एकदा पहावयास मिळत आहे.आतापासूनच डाव प्रतिडाव वापरण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.आज शुक्रवारी ( दि.२४) रोजी ५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अखेर एकूण १०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
तर आज 89 अर्जांची विक्री झाली असून एकूण 387 अर्ज विकले गेले आहेत.भू विकास बँकेच्या कार्यालयात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. गटनिहाय अर्ज भरून घेण्यात येत आहेत.सोमवार ( दि.27 ) रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून शेवटच्या दिवशी कोण कोण मातब्बर अर्ज दाखल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर वरिष्ठ सहायक निबंधक प्रदीप मालगावे व अमित गराडे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत.
