
बहिरेश्र्वर: (ता.करवीर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्र्वर मध्ये तब्बल २६ वर्षांनी १९९६-९७ सालाच्या दहावीला असलेल्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्यांना ज्ञानदान करणाऱ्या गुरूजनांचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ए.एन. पाटील तर प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक आळवेकर होते.
या मेळाव्यासाठी तब्बल २६ वर्षांनी विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षक एकत्र आले, शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थाना सतत दहा वर्षे अनुभवलेली शाळा, मिळालेले ज्ञान, संस्कार, परिसराची पुन्हा आठवण करून गेल्या आणि सर्वांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणीना उजाळा दिला. सर्व शिक्षकांचे फेटे बांधून फुलांनी उधळण करत, स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. कोविडमध्ये दिवगंत झालेल्या सर्वांचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले.ए.एन. पाटील व आळवेकर यांनी २६ वर्षांत शाळेने, संस्थेने केलेली प्रगती शाळेच्या विकासाबाबत व माजी विद्यार्थानी केलेल्या यशस्वितेबद्दल मार्गदर्शन केले अनेक जुन्या आठवनीना उजाळा दिला.
शाळेतील गमती -जमती सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी रमून गेलेत २६ वर्षांनी प्रत्येकात झालेला बदल हा सर्वांच्या चर्चेचा विषय होतो. मेळावा आयोजित करण्या पाठीमागे जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटता यावे, आपल्या गुरुजींना प्रति आदर व्यक्त करता यावा हा महत्त्वाचा उद्देश होता असे सांगण्यात आले.
या माजी विद्यार्थी स्नेही मेळाव्यासाठी १९९६/ ९७ सालचे सर्व शिक्षक व ८० विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यासाठी नामदेव म्हाकवेकर, सतीश हवलदार, युवराज पाटील, गंगाराम कुंभार, कृष्णात काशीद, शारदा बचाटे, आनंदी शेलार यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. इ.पी दिंडे तर आभार डॉ.अनिल बचाटे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक के.एन.बोराटे यांनी केले.
