राजाराम ‘साठी आज अखेर ४९ उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : सतेज पाटील विरुद्ध महाडिक या पारंपरिक विरोधी गटाच्या तीव्र राजकीय संघर्षाची झलक छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळत आहे. आज( गुरुवारी )31 अर्ज दाखल झाले असून एकूण 49 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर आज 30 अर्जांची विक्री झाली असून आत्तापर्यंत एकूण 298 अर्जांची विक्री झाली आहे.

सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून उद्या शुक्रवार ( दि.24 ) रोजी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ज्यांना निवडणूक लढवावयाची आहे, त्या उमेदवारांनाच अर्ज भरण्यासाठी कार्यालयात प्रवेश देण्याचा आदेश निवडणूक विभागाने काढला आहे. पहिल्या दिवशी माजी आ. महादेवराव महाडिक, अमल महाडिक, चेअरमन दिलीप पाटील, माजी चेअरमन सर्जेराव माने, दिलीप उलपे हे पाच विद्यमान संचालक व माजी संचालक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भू विकास बँकेच्या कार्यालयात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. गटनिहाय अर्ज भरून घेण्यात येत आहेत.अर्ज दाखल केलेल्यांमध्ये माजी संचालक शिवाजी रामा पाटील, सर्जेराव भंडारे, मारुती कीडगावकर यांचा समावेश आहे. गतवेळच्या निवडणुकीत विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाबुराव दादू बेनाडे, किरण बाबासो भोसले, शिवाजी ज्ञानू किबिले यांनी यावेळीही विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर वरिष्ठ सहायक निबंधक प्रदीप मालगावे व अमित गराडे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

🤙 8080365706