
उन्हाळयात दररोज नारळपाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते. यासाठी आजकाल अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये नारळपाण्याचा वापर केला जातो. आपण देखील यंदाच्या उन्हाळ्यात नारळ पाण्याचा वापर करुन आपल्या स्किनची देखभाल करु शकता.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करावा :- कधी उन्हांतून बाहेरुन फिरुन आल्यावर नारळ पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. कापसावर किंवा एका सुती कापडावर थोडेसे नारळ पाणी ओतून त्याने आपला चेहेरा स्वच्छ पुसून घ्यावा. जर आपण नारळ पाण्याने फेशिअल करत असाल तर नारळ पाण्याने चेहरा धुवून घ्या. असे केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील धुळ, माती, मेकअपचे कण निघून जातील. नारळपाण्याने चेहरा धुतल्यानंतर, चेहरा टिश्यू पेपर किंवा स्पंजने न पुसता तसाच कोरडा होऊ द्या.
टोनरसाठी वापरा नारळपाणी व गुलाबपाणी :- चेहरा स्वच्छ केल्यावर आपला चेहरा टोन करण्यासाठी देखील नारळपाण्याचाच वापर करायचा आहे. यासाठी नारळपाणी व गुलाबपाणी एकत्रित करुन कापसाच्या बोळ्याने ते चेहऱ्यावर लावा. क्लिंझिंग आणि टोनिंगमुळे आपली स्किन मऊ आणि फ्रेश होईल.
स्क्रब बनवण्यासाठी वापरा नारळ पाणी :- चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यासाठी आणि स्किन खोलवर स्वच्छ होण्यासाठी आपण स्क्रबरमध्येही नारळपाण्याचा वापर करू शकता. यासाठी कॉफी पावडर, नारळपाणी आणि कोरफडीचा गर एकत्रित करुन ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. हे स्क्रब चेहेऱ्यावरुन काढताना बोटांच्या मदतीने सर्क्युलर मोशनमध्येच तो स्क्रब काढावा. पाच मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
