
डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यश : अत्याधुनिक नवजात शिशु विभाग ठरला वरदान
कसबा बावडा: कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये केवळ ५ दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
५ दिवसाच्या उपचारानंतर हे बाळ बरे झाले असून हॉस्पिटलचा नवजात शिशु विभाग वरदान ठरला आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या करवीर तालुक्यातील महिलेला 8 मार्च रोजी मुलगा झाला. 3.4 किलो वजनाच्या या मुलाला जन्मतः डोक्याच्या मागे एक मोठी गाठ होती. तपासणी केली असता या बाळाच्या मागच्या कवटीला छेद असल्याचे दिसून आले. त्यातून मेंदूचे आवरण व पाणी यांची गाठ तयार झाली होती.
रुग्णालयातील अत्याधुनिक नवजात शिशू विभागात या बाळाला दाखल करण्यात आले. नवजात शिशु तज्ञ डॉ. निवेदिता पाटील व न्युरो सर्जन डॉ. उदय घाटे यांनी ही गाठ शस्त्रक्रिया करून काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला पालकानीही संमती दिली. त्यानुसार १३ मार्च रोजी भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या बाळाला भुल दिली आणि न्युरो सर्जन डॉ. उदय घाटे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली. त्यानंतर या बाळाला पुन्हा नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले. 5 दिवसात बाळ पूर्ण बरे झाले असून त्याला आईकडे सुपूर्द करण्यात आले.
डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या सहकार्याने अत्याधुनिक व अद्ययावत असा ३० बेडचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु करण्यात झाला आहे. जोखमीचे व अत्यंत जोखमीचे नवजात बालक, कमी दिवसाचे, कमी वजनाचे नवजात शिशू यावर या विभागात सर्व आत्याधुनिक उपचार अत्यंत कमी खर्चात केले जातात. गरजू रुग्णांना अशी सेवा देण्यात रुग्णालय व येथील प्रशासन डॉक्टर्स नेहमीच पुढे असतात. अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, बाल रोग विभागप्रमुख डॉ. अनिल कुरणे, भूलविभाग प्रमुख डॉ. संदीप कदम यांचे या शस्त्रक्रियेसाठी मोठे सहकार्य लाभले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी या बळावर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
