
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत असून, काळजीचे कारण नाही. तातडीच्या संवर्धनाची गरज नसल्याचा निर्वाळा केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मूर्तीच्या अवस्थेबाबत विभागाचा अहवाल व त्यातील सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिली.अंबाबाईच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली असून, मूर्तीचा चेहरा, कान, नाक, हनुवटीसह मूर्तीवरील संवर्धन निघाले आहे. यावरून कोल्हापुरात गदारोळ झाल्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी राज्य पुरातत्व खात्याचे सहसंचालक विलास वहाने यांनी मूर्तीची पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मूर्तीची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांना पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या दरम्यान केंद्रीय पुरातत्व खात्याचे शिवण्णाकुमार, राम निकम, राजेश्वरी तसेच कोल्हापूर पुरातत्व खात्याचे उत्तम कांबळे यांनी अर्धा तास त्यांनी मूर्तीची पाहणी केली.
