
मुंबई : गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणे आता पर्यटकांना चांगलेच महागात पडणार आहे.

किल्ल्यावर दारू पितांना आढळण्यास आता तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा केली जाणार असून राज्य सरकार देखील किमान १० हजार रुपयांचा दंड आकारणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबत माहिती दिली असून या कारवाईसाठी हेरिटेज मार्शल नेमले जाणार आहेत. राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी गडकिल्ल्यांच्या संरक्षण, जतन, संवर्धनाचा मुद्दा काल सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडण्यात आला होता. संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, भीमराव तापकीर आदींनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देतांना सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ३८७ संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते. निधीदेखील पुरेसा दिला जात नसल्याने या किल्ल्यांचे पावित्र्य धोक्यात आले होते. आता मात्र जिल्हा नियोजनपैकी सुमारे ५१३ कोटींचा निधी या किल्ल्यांसाठी दिला जाणार असून ७५ स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी ६५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
