
कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर आज त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहे.

मात्र, ते वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार आहेत.दरम्यान, कागलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मोजक्याच शब्दामध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, “ईडीचे पथक घरी येऊन गेले. ईडीने नोटीस पाठवली आहे. टीव्हीवर घरच्यांची अवस्था दिसल्याने मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. ईडीकडून नोटीस आल्याने वकिलांना ईडीकडून मुदतवाढ घेण्यास सांगितली आहे. मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेर असल्याने त्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी आहे. त्यामुळे ईडीच्या समन्सला उत्तर देण्यासाठी महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. पहिल्या केसमध्ये केसमध्ये माझे नाव नव्हते. त्यामुळे त्यांना ईडीला उत्तर देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
