‘सीपीआर’मधील वरिष्ठ लिपिक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात..!

कोल्हापूर : पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सीपीआर रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुसेनबाशा कादरसाब शेख असे (वय 47) या लिपीकाचे नाव आहे.तक्रारदार हा देखील सीपीआर रुग्णालयात अभिपरिचारीका पदावर कार्यरत असून त्यांना नोकरीतील पुढील लाभ मिळण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्याकरिता त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सीपीआर रुग्णालय कोल्हापूर यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. 20 दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सहीचे स्थायित्व प्रमाणपत्र त्यांना वरिष्ठ लिपीक शेख यांनी दिले होते. या प्रमाणपत्राच्या बदल्यात शेख यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर विभागाकडून सापळा रचत शेख यांना रंगेहात पकडण्यात आले.

शेख यांच्याविरोधात लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अमोल तांबे, पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, सरदार नाळे, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन कुंभार, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, संजीव बबरगेकर, पोलीस उपनिरीक्षक, पो.हे.कॉ. विकास माने, पो.ना. सचिन पाटील, पो. कॉ. रूपेश माने चा.पो. हे. कॉ. सुरज अपराध, यांनी केली आहे.

🤙 8080365706