
वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व आलंय? रात्रीची झोप उडाली आहे? जर तुम्ही या समस्येमधून जात असाल तर, याचं कारण कदाचित साखर असू शकतं. साखररेचं सेवन आपण अनेक पदार्थांमधून करतो. गोड पदार्थ बनवायचं असेल तर, साखरेचा उपयोग होतोच. पण जर तुम्ही १४ दिवसांसाठी साखरेचं सेवन बंद केलं तर? याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होतो.

साखर हे एक हाय कॅलरी फूड आहे. १ ग्राम साखरेमध्ये ४ टक्के कॅलरी असते. ज्याचं रुपांतर झपाट्याने फॅटमध्ये होते. अशा परिस्थितीत लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हायपरलिपिडेमिया, हृदय आणि मेंदूशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने १०,००० साखरप्रेमींचे १५ वर्षांसाठी सर्वेक्षण केले, यात असे आढळून आले की, सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत साखर प्रेमींमध्ये हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका ३ पट जास्त आहे. त्यामुळे साखरेयुक्त पदार्थ आपल्यासाठी घातक आहे.”यासंदर्भात फोर्टिस रुग्णालयातील आहारतज्ज्ञ सिमरन सैनी म्हणतात, ”जर आपण १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केलं, तर शरीरात आरोग्यदायी बदल दिसून येतील. चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या कमी होतात, वजन कमी होते, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते, अधिक उत्साही आणि सक्रिय वाटते. यासह मूत्रपिंडाचे कार्य आणि चयापचय क्रिया उत्तमरित्या काम करते”
