
कागल :कागल शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती चौकशी स्थगिती देऊन फेर चौकशीचे आदेश दिले आहेत. या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी म्हणून आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी प्रयत्न केले.

आमदार मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे तर खासदार मंडलिक यांनी आज त्यांची भेट घेतली.
कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिलेल्या या प्रसिद्धी पत्रकावर ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, नगरसेवक प्रवीण काळबर, पक्षप्रतोद नितीन दिंडे यांच्या सह्या आहेत. पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, महिन्यापूर्वी कागल शहराचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला होता. शेतकऱ्यांसह व्यापारी, व्यावसायिक अशा सर्वच स्तरातून या आराखड्याला विरोध झाला होता. तशा हरकतीही नगरपालिकेकडे आल्या आहेत. यासंदर्भाने आमदार हसन मुश्रीफ यांनी शाहू हॉलमध्ये सर्व संबंधितांची व्यापक बैठक घेतली आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या. या आराखड्याला विरोध करून स्थगिती आणू, असा विश्वास आमदार मुश्रीफ यांनी दिला होता. तसेच, कृती समितीने विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना भेटूनही निवेदन दिले होते. ही स्थगिती मिळून फेरचौकशी होवून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबेल, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त केली आहे.
