
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटून मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच यापंचक्रोशीतील नागरीकांच्या पिण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला होता यामुळे सदर प्रकल्पास निधी मंजूर होवून त्याचे काम देखील लवकरात-लवकर सुरू होणे गरजेचे आहे. याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष बाब म्हणून दिलेल्या मान्यतेमुळे यश आले असून प्रकल्पास 41 कोटी 65 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरूवात करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प फुटल्यामुळे मेघोली सह पंचक्राशितील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच उर्वरीत शेती व नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याच प्रश्न गंभिर बनला होता. यामुळे प्रकल्पाच्या कामास मंजूरी घेवून त्यास निधी मिळविणे गरजेचे आहे. याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून प्रकल्पाच्या कामास दि.06 मार्च, 2023 रोजी महाराष्ट्र जलसंधारण विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार 41 कोटी 65 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून याप्रकल्पाच्या कामास लवकरच सुरवात करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कामास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
