
सावर्डे : आमदार हसन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या ४० हजार शेतकऱ्यांनी शेअर्सपोटी ४० कोटी रुपये दिले. हे पैसे कारखान्याच्या बँक खात्याच्या तपशिलात दिसत नाहीत. दहा दिवसांपूर्वी याबाबत त्यांना हे पैसे कुठे गेले? असा प्रश्न विचारला होता. याबाबतीत ते काहीच न बोलत नाहीत.ते कोणत्या बिळात लपले आहेत? त्यांनी बिळातून बाहेर येऊन संताजीच्या सभासद शेतकऱ्यांना उत्तर द्यावेअन्यथा. शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपये त्यांनी खाल्ले आहेत. असे समजायचे का ? याचे उत्तर त्यांनी बिळातून बाहेर येऊन द्यावे. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांना केले.

सावर्डे खुर्द ता. कागल येथे एक कोटी पंधरा लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर नळपाणी पुरवठा योजनेचे उदघाटन व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भवानी सेवा संस्थेचे चेअरमन आनंदराव डाफळे होते. घाटगे पुढे म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे हा कारखाना ४० हजार शेतकऱ्यांचा असल्याचे ते वारंवार म्हणतात. मग त्यांच्या आवाहनानुसार याशेतकऱ्यांनी विश्वासाने शेअर्स पोटी रुपये ४० हजारशेतकऱ्यांनी रू ४० कोटी दिले.हे शेतकरी या कारखान्याला सभासदच नाहीत. उलट मुश्रीफ यांच्या कुटुंबातील व्यक्ती व कांही कंपन्याच या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आहेत.ज्या विश्वासाने शेतकऱ्यांनी त्यांना शेअर्सपोटी इतकी मोठी रक्कम दिली. त्या ४० हजार शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वासघातच केला आहे.
यावेळी बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील आनंदराव डाफळे,तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.व्यासपिठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक सचिन मगदूम,सरपंच लक्ष्मी डाफळे,उत्तम पाटील,भाऊसो कांबळे,दिनकर वाडकर,चंदर दंडवते,नामदेव बल्लाळ आदी उपस्थित होते.
स्वागत मालवेकर यांनी केले.आभार गुरुप्रसाद डाफळे यांनी मानले.
संचालक सभासद तरी आहेत का? तालुक्यातील काही मंडळी घोरपडे कारखान्याचे संचालक असल्याचे विविध कार्यक्रमातून मिरवतात. मात्र या मंडळींनी आपण या कारखान्याचे सभासद तरी आहोत का? याची खातरजमा करावी.अशी कोपरखळी त्यांना घाटगे यांनी यावेळी मारली.
