
उन्हाळ्यामध्ये आहारात काही विशेष बदल करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून शरीर दिवसभर हायड्रेटेड व उर्जावान राहील. महिलांनी उन्हाळ्यामध्ये आहाराच्या बाबतीत या टिप्सचे पालन अवश्य करावे.

पोषक ब्रेकफास्ट घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचा ऊर्जा स्तर दिवसभर उच्च राहू शकतो. एक वाटी दह्यामध्ये आंबा किंवा केळे यासारखी ताजी फळे मिसळून घेऊ शकता. मिश्र भाज्यांचा स्टफ्ड पराठा किंवा एक छोटी प्लेट पोहे, उपमा हे देखील खूप चांगले पर्याय आहेत. ब्रेकफास्टसोबत कॉफी, चहा घेणे टाळावे कारण त्यामुळे शरीर डीहायड्रेट होते. त्याऐवजी हर्बल टी किंवा नारळपाणी प्या.दुपारच्या जेवणामध्ये संतुलित आहार घ्यावा.
ताज्या भाज्या, प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स यांचा दुपारच्या जेवणात समावेश असला पाहिजे. मिश्र भाज्यांची उसळ, थोडा भात आणि कोशिंबीर घेऊ शकता. शरीर थंड व हायड्रेटेड राखण्यासाठी काकडीची कोशिंबीर अवश्य घ्यावी.दुपारी उशिरा भूक लागू शकते आणि काहीतरी स्नॅक्स खावेसे वाटू शकतात. अशावेळी एक प्लेट मोड आलेल्या कडधान्यांची टोमॅटो आणि कांदे घातलेली कोशिंबीर, ताजी फळे व लो-फॅट दूध यापासून बनवलेले फ्रुट कस्टर्ड एक वाटी, एक वाटी रोस्टेड मखाणे हे चांगले पर्याय आहेत.
उन्हाळ्यामध्ये दिवसाची सुरुवात आरोग्यदायी व्हावी यासाठी उठल्या-उठल्या एक ग्लास पाणी प्यावे. असे केल्याने शरीर तर हायड्रेटेड राहतेच, शिवाय चयापचय क्रियेला प्रोत्साहन मिळते. त्यामध्ये एक लिंबाची फोड पिळल्यास किंवा पुदिन्याची काही पाने टाकल्यास तुम्ही अजून जास्त ताजेतवाने होऊ शकता.
