
कोल्हापूर : कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या ठिकाणी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणाऱ्या स्वयंसेवकावर कारवाई करावी, मठावरील गाईचा मृत्यू का झाला व यामध्ये किती गाईंचा मृत्यू झाला याचा आकडा मठाने अधिकृतरित्या जाहीर करावा, यासह इतर मागण्यांचे निवेदन कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

कणेरी मठावर २५ वर्षांपासून भाकड गाईंचे संगोपन केले जात आहे. सुमारे १२०० हून आधी गायी या ठिकाणी सांभाळल्या जात आहेत. हा देखील या कार्यक्रमातील एक भाग आहे. या संभाळल्या जाणाऱ्या गायींपैकी काही गायींचा शुक्रवारी आकस्मिक मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या वृत्ताचे वृत्तांकन करावयास गेलेल्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला कणेरी मठ तेथील स्वयंसेवकाकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हाधिकारी ऑफिससमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेतील मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी व पत्रकार, छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
