
मुंबई :शिवसेना पक्ष आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. एवढच नाही तर त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

‘घरफोडी केलेली आहे, दरोडा घातला आहे.जेवढं काही आपल्या खोक्यात घालता येईल तेवढं घातलं आहे. पोलीस चोराला सांगत आहेत, यांची दोन-तृतियांश मालमत्ता तुझ्याकडे आहे, त्यामुळे उरलेली मालमत्ताही तुझीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिला आहे, हा निकाल अत्यंत अयोग्य आहे.कारण जो घटनाक्रम घडला आहे, त्याप्रमाणे निकाल अपेक्षित आहे’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
