शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात

मुंबई : शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिंदे गटामध्ये आनंदाचं उधाण आलं आहे. तसेच शिंदे गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावरील सर्व वास्तू ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने आज आपला पहिला मोर्चा विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाकडे वळवला. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतलं.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी फक्त आणि फक्त शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी उभे होते. ठाकरे गटाचा एकही पदाधिकारी आणि आमदार उपस्थित नव्हता. कोणताही खळखळ झाली नाही. विरोध झाला नाही आणि घोषणाही झाल्या नाहीत. आता शिवालय ताब्यात घेण्याच्या दिशेने शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात बैठकीचं आयोजन केलं होतं. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आलं होतं. स्वत: भरत गोगावले, आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांच्यासह अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीपूर्वीच भरत गोगावले यांनी आमदारांना सोबत घेऊन विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी फक्त आणि फक्त शिंदे गटाचे आमदारच उपस्थित होते.

🤙 8080365706