निसर्गाच्या कुशीत वसलेलं चक्रेश्वर वाडीतील प्राचीन शिवमंदिर

कोल्हापूर (ज्योती पाटील) :कोल्हापूर पासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेले, चक्रेश्वर वाडीतील एक सुंदर असं प्राचीन शिवमंदिर आहे. राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगर माथ्यावर असणारे चक्रेश्वर मंदिर हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे.

मंदिराच्या काही अंतरावरून नदी वाहत असल्याने या ठिकाणचा निसर्ग भक्तांना भुरळ घालतो. राधानगरी तालुक्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या डोंगर माथ्यावर चक्रेश्वर वाडी ही हजार लोकसंख्येची छोटीशी वाडी आहे.मात्र प्राचीन शिवमंदिरामुळे या वाडीला मोठे धार्मिक महत्त्व प्राप्त झाल आहे. या मंदिराच्या परिसरात चक्राकार असलेल्या विशिष्ट आकारांचे अनेक पाषाण आहेत. पाषाणावर चक्राकार कोरीव आकार आहे. त्यावर ओम सारणी व कंकाळ अशी चक्र आहेत. त्यावरून या वाडीला ‘चक्रेश्वरवाडी’ असे नाव पडले आहे.

चक्रेश्वर मंदिर हेमाडपंती शैलीचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिराच्या समोर मोठी दीपमाळ आहे. तर उजव्या बाजूला बेबी चा दर्गा आहे. या अतिशय देखणी अशी दीपमाळेचा स्तंभ आहे. महाशिवरात्री दिवशी दीप पाजळले जातात यामुळे मंदिर परिसर दिव्यांनी उजळून जातो. मंदिराच्या प्रवेशद्वारातच श्री गणेशाची भव्य बैठी मूर्ती आहे. गणेश मंदिराच्या मागील बाजूस एकमेकाला लागून बसलेले तीन नंदीच्या मूर्ती असून गणेश मूर्ती दीपमाळेकडे पाहत आहे. तीन नंदी मुख्य मंदिरातील शिवलिंगाकडे पाहत आहेत. तीन नंदी असणारे हे एकमेव शिवमंदिर असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. तीन नंदीसमोरच मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग रूपातील पिंडीवर पितळेचे मुख्यलिंग नागमूर्ती आहे. हेमाडपंथी शैलीचे कोरीव खांब त्यावर चक्रे व टप्प्यांचा मंडप आहे. मंदिराच्या मंडपात एक शिलालेख आहे. प्रवेशद्वारावर उंबरठ्याजवळ काही अक्षरे कोरलेली दिसतात मंदिरात महालक्ष्मी, महाकाली व महा सरस्वतीच्या पाषाणमूर्ती तसेच रंगभैरव, भैरवी, कार्तिक स्वामी, महाविष्णू ,महिषासुरमर्दिनी, नरसिंह या देवदेवतांच्या मुर्त्या आहेत. मंदिरातील भैरव मूर्तीला ‘खोकलोबा’ असे म्हणतात. शिवलिंगा मध्ये मानवी उत्क्रांतीतील संयोगी शिवलिंग, मनुष्य लिंगयुक्तपिंडी, मुखलिंग आणि सध्याचे शिवलिंग आहे. चक्रेश्वर वाडी येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या पूर्वेला ग्रामदेवताचा मांड आहे. तसेच नवसाची दीडशे किलो वजनाची गुंडी आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी या मंदिर परिसरात काही पांडवकालीन लेणी सापडली आहेत. असे हे चक्रेश्वर वाडीतील प्राचीन शिवमंदिर भक्तांसाठी नक्कीच श्रद्धास्थानआहे.

🤙 8080365706