
कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांचे प्रतिपादन-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात ‘कोर्ट-२०२३’ संपन्न
कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार आणि गरज दोन्हीही सातत्याने वाढत आहे. आरोग्यसेवेचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी वैदयकीय क्षेत्रात सातत्याने संशोधन गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी केले.

विद्यापीठातील मेडिकल व नर्सिंगच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यापीठ संशोधन व प्रशिक्षण मोहिमेच्या (कोर्ट) उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आरोग्य सेवेतील समस्या ओळखून त्यावर योग्य उपाय शोधून काढण्यासाठी संशोधन महत्वाचे आहे. उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी त्याचा वापर करता येईल, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा बरा होण्याचा कालावधी कमी कसा करता येईल यासाठी संशोधन करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतीवर्षी ‘कोर्ट’ चे आयोजन केले जाते. कुलगुरु राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. मनीषा बिजापूरकर, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, कोर्ट-२०२३ चे सचिव डॉ. बी. सी. पाटील, पृथ्वीराज पी.जी. क्लबचे सदस्य यांच्यासह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. डी. वाय. पाटील विद्यापीठ शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात भरारी घेत असून त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकलचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे प्रथम वर्षाचे ७२, द्वितीय वर्षाचे 81 तर नर्सिंगच्या १६ विद्यार्थ्यानी यावेळी संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाकडून गौरव केला जाणार आहे. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या उपक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
