निवडणूक ‘कुंभी’ची.. समीकरणे बदलणार ‘करवीरच्या राजकारणाची’ ची..

कोल्हापूर : दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदार यांच्या प्रतिष्ठेची ठरलेली कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सत्ता मिळवली. निवडणूक कुंभी कासारी साखर कारखान्याची पण या निवडणुकीमुळे करवीर तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीतील पारंपरिक विरोधक चंद्रदीप नरके आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या लढतीतील ही रंगीत तालीम ठरली. नरके यांच्या राजकीय सत्तेला सुरुंग लावण्यासाठी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकवटले होते. त्यांना आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय कोरे यांनी खुराक देऊन पाठबळ दिले.निवडणूक रंगात आली असतानाच नरके घराण्यातीलच गोकुळचे नेते अरुण नरके व त्यांचे चिरंजीव चेतन नरके यांनी या निवडणुकीच्या मैदानात अचानक उडी घेतली. हे घडणार हे ओळखूनच असलेल्या चंद्रदीप नरके व त्यांचे बंधू अजित नरके यांनी चाणाक्षपणे अरुण नरके आणि चेतन नरके यांचे अनेक कार्यकर्ते अगोदरच आपले केल्याने त्यांचा फारसा प्रभाव उमटला नाही. त्या दोघांचे करवीर पन्हाळा येथे चांगले प्राबल्य असले तरीही, कुंभीच्या राजकारणात येण्याचे त्यांची वेळ चुकली होती असेच म्हणावे लागेल. चंद्रदीप नरके यांना आमचं ठरलंय असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी दिलेली साथ विजयापर्यंत पोहोचवलेली यशस्वी ठरली.सतेज पाटलांमुळेच चंद्रदीप नरके यांना जयवंत आसगावकर यांची साथ मिळाली. तर नरके यांच्या विजयाने आमदार पी.एन. पाटील व विनय कोरे यांच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. गगनबावडा तालुक्यात आमदार सतेज पाटील यांना मानणारी पंचवीस हजार मते आहेत.गत विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच पी एन पाटलांना करवीर मध्ये आमदारकी मिळण्यास फायदेशीर ठरली होती. कुंभी च्या निवडणुकीत सतेज पाटील व चंद्रदीप नरके एकत्र आले आहेत. ही युती करवीर मध्ये राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते.आत्ता निवडणूक ‘कुंभी’ची झाली, पण त्या निमित्ताने नरके – सतेज पाटील यांनी हातात हात घातल्याने भविष्यातील राजकिय गणिते आणि समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

🤙 8080365706