
कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या वैभवशाली परंपरा लाभलेल्या संस्थेचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व ‘ शतसंवत्सरी ‘ या स्मरनिकेचा प्रकाशन सोहळा दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी 2.30 वाजता पेटाळा क्रीडांगण येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती न्यू एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी प्रभाकर हेरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या कार्यक्रमाविषयी माहिती देताना हेरवाडे म्हणाले,19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे भूषवणार असून हा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.पुढे बोलताना ते म्हणाले, विनोद कुमार लोहिया हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून या शताब्दी महोत्सवी सांगता समारंभा निमित्त इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थिनी, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे.
