
शिर्डी ( अहमदनगर ) : साईबाबांच्या खजिन्यात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. साईबाबांवर माझी अतुट श्रद्धा आहे. बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला भरभराट आली. त्यामुळे ३१० ग्रॅम वजनाचा ३० लाखांचा सोन्याचा नवरत्न हार साईचरणी अर्पण केल्याचे एका भक्तांना सांगितले.

हैदराबादचे साईभक्त राजलक्ष्मी भुपाल आणि कामेपल्ली भुपाल या दाम्पत्याने साईना एवढी मोठी देणगी दिली. ३० लाखांचा सोन्याचा नवरत्न हाराशिवाय ११७८ ग्रॅम वजनाचे ३१ हजार ७५२ रुपयांचे नैवेद्यासाठी चांदीचे ताट, ग्लास, प्लेट देखील अर्पण करण्यात आले आहे. यावेळी साईसंस्थानच्यावतीने भुपाल परिवाराचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साईसंस्थानचे लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
साईबाबांच्या खजिन्यात दिवसेंदिवस सोने, चांदी, हिरे, माणके, मोती व रोख स्वरुपात भरभरून दान जमा होत आहे. दानशूर भक्तांमध्ये हैदराबाद येथील भाविकांची संख्या जास्त आहे. हैदराबाद येथील रहिवासी कामेपल्ली भुपाल आणि त्यांच्या पत्नीराजलक्ष्मी भुपाल दाम्पत्याने मध्यान्ह आरतीपूर्वी साईबाबांच्या चरणी ३० लाखांचा सोन्याचा नवरत्न हार अर्पण केला.साईंच्या दर्शनासाठी सहकुटुंब हजेरी : व्यवसायात चांगले यश मिळावे तसेच कुटुंब सुखी समाधानी रहावे, यासाठी बाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. आज मी माझ्या व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहे. त्यामुळे आज बाबांच्या दर्शनासाठी माझ्या पती, मुलगा व माझ्या परिवाराला घेऊन आले. माझा मुलगाही बाबांचा मोठा भक्त असल्याचे यावेळी राजलक्ष्मी भुपाल यांनी सांगितले.
