
मुंबई : ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर वरळीतून माझ्या विरोधात लढा, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानानंतर शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले. आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंत पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, शिंदे गटातील नेते तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. राज्यात चार वेड्याचे रुग्णालयं आहेत. या रुग्णालयांत जागा असेल तर मी त्यांना रुग्णालयात पाठवण्यास तयार आहे, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत.

ते सोलापुरात माध्यम प्रतनिधींशी बोलत होते.सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कोठे जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ली मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू,” असे तानाजी सावंत म्हणाले.
