
आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा घेणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. अनेकांसाठी अमृत असलेला चहा आरोग्यासाठी मात्र घातक ठरु शकतो. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास आरोग्याच्या काही समस्या उद्भवतात. त्या आपण जाणून घेणार आहोत.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम…
पोटात जळजळ चहामध्ये असणारे आम्ल पोटासाठी हानिकारक असते. यामुळे पोटाच्या आतील अस्तरांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटात जळजळ झाल्यासारखे किंवा अस्वस्थ होते.
ऍसिड रिफ्लक्स आपल्या शरीरात विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया सुरू असतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात अॅसिडचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे ऍसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होऊ शकते. यालाच आपण अॅसिडीटीचा त्रास झाला असेही म्हणतो. चहा हे अॅसिडीटी वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण असते.
डीहायड्रेशन अनेक जण दूध न घालता लेमन टी, ब्लॅक टी असे घेतात. अशाप्रकारचा चहा हा कॅफिनयुक्त असतो. त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. असे झाल्यास शरीरातील पाणी जास्त प्रमाणात शरीराबाहेर पडते आणि शरीराचे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, चहामध्ये टॅनिन असते जे रिकाम्या पोटी सेवन केल्यावर शरीरातील लोह आणि इतर खनिजांच्या शोषणात व्यत्यय येऊ शकतो.
