
कोल्हापूर : जिल्हा कॉग्रेस चे माजी अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील आणि गोकुळ चे माजी अध्यक्ष अरुण नरके हे नव्याने पुन्हा एकत्र आले. जिल्ह्यातील राजकारणात एकत्र येत सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेसह सर्व निवडणुकांत सामंजस्याने, तडजोडीने एकदिलाने काम करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. शाहूपुरी येथील श्रीपतराव दादा बँकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यात ४० वर्षाहून अधिक काळ सहकार आणि राजकारणात हे दोन्ही नेते सक्रीय आहेत. महाडिक, नरके आणि पाटील या त्रयींचा जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षे दबदबा होता. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ अशा विविध ठिकाणची सत्ता ताब्यात ठेऊन जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवली होती. यापैकी महादेवराव महाडिक आणि पी. एन.पाटील यांनी पक्षीय राजकारणातून विधानसभा आणि विधान परिषदेची निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. अरुण नरके हे सहकार आणि गोकुळ दूध संघाच्या विकासात योगदान देत सार्वजनिक राजकारणापासून दूर राहिले असे असले तरी मध्यंतरीच्या काळात पुतणे चंद्रदीप नरके यांच्या आमदारकीसाठी अरुण नरके यांनी राजकारणात वेगळी भूमिका घेतली. या त्यांच्या भूमिकेमुळे पी.एन.पाटील आणि त्यांच्यात काही काळ दुरावा निर्माण झाला होता मात्र गोकुळ च्या राजकारणात मात्र हि मैत्री कायम राहिली. सहकार आणि विविध क्षेत्रातील व्यासंग आणि जनसंपर्कामुळे तसेच गोकुळ च्या विकासातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांना मानणारे लोक आहेत. त्यांचे सुपुत्र डॉ. चेतन नरके हे देखील कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने जिल्हाभर कामाच्या माध्यमातून कार्यकर्ते जोडत आहेत.
आमदार पी.एन.पाटील यांचे देखील करवीर सह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. हे दोन्ही नेते एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे जुळून येतील असे मानण्यात येते. या निर्णयाने चंद्रदीप नरकेंच्या कुंभी कारखान्यासह इतर राजकारणाला मोठा धक्का बसणार आहे. या बैठकीच्या वेळी दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
