
कुडीत्रे : आज पर्यंत मला वातकर मामांच्यामुळे सांगरुळमध्ये चांगलं मताधिक्य मिळत आलेले आहे त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा निवास वातकर यांनी राजकीय वारसा पुढे चालवला आहे आज त्यांना कुंभीच्या निवडणुकीत यावेळी पॅनेलमध्ये स्थान मिळालं नसलं तरी त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची माझी जबाबदारी आहे असं प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.

सांगरुळ येथे कुंभी चे उपाध्यक्ष निवास वातकर यांनीआयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. उमेदवार संजय पाटील (खुपिरे), किशोर पाटील व धनश्री पाटील तसेच निवास वातकर यांच्यावर वर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कै. निवृत्ती वातकर यांच्यामुळे सांगरुळ येथून प्रत्येक निवडणुकीत मला कायमच भरघोस लीड मिळत आलं आहे. वातकर मामांच्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र निवास वातकर पुढे वारसा चालवत आहेत. पॅनेलमध्ये संधी दिली नाही म्हणून निवास वातकर नाराज नाही झाले तर त्यांनी सांगरुळ येथे मेळावा घेऊन मला गावात बोलावून पाठिंबा दिला. अशी व्यक्ती मी प्रथमच पाहिली आहे. निवास यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली. कारखान्यात साडेसात वर्षे स्थान मिळाले. अडीच वर्षे उपाध्यक्ष पदाची संधी दिली असेही चंद्रदीप नरके म्हणाले. निवास वातकर म्हणाले, मी माणूस आहे. मलाही खंत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मी अनेकांना उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाली नसल्याने कार्यकर्त्याचं काय होतं याची जाणीव आहे. नरके यांना कायमच सांगरुळ गावांमध्ये लीड दिलं आहे. आता कुंभीच्या निवडणुकीत सांगरुळमधून कमी मतदान झाल्यास माझ्यावर ठपका ठेऊ नये. विधानसभेलाही सांगरुळ येथून लीड दिलं आहे. मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी अन्य पक्षात गेलो नाही. जातीसाठी माती खाल्ली. माझ्याविषयी तुमचे कोणी कान भरले त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहचला पाहिजे ही पण गरज आहे. मी कायम नरके यांच्याच पाठीशी खंबीरपणे राहणार आहे असेही निवास वातकर म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, किशोर पाटील, कुंडलिक पाटील, नरके पॅनेलच्या उमेदवार धनश्री पाटील उपस्थित होते.
