
कागल : राजधर्म आणि कर्तव्य म्हणून आमच्या पूर्वजांनी कागलमधील अनेक वसाहतीतील गरीब व गरजू लोकांना जागा दिल्या. आत्तापर्यंत जवळपास सात आठ खात्याचे मंत्री म्हणून तुम्ही काम केले आहे. सरकार तर तुमचेच होते. मागील तीस वर्षात या जागा त्यांच्या नावावर का झाल्या नाहीत?काय राजकीय हेतूने त्या जाणीवपूर्वक केल्या नाहीत?याचे उत्तर द्या? खरे अज्ञानी कोण हे जनतेला सांगा ?असा परखड सवाल शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला.

शिंदे -फडवणीस सरकार सत्तेवर येताच केवळ सहा महिन्यांमध्ये अतिक्रमित जागा नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल वसाहतीतील नागरिकांच्या वतीने घाटगे यांचा सत्कार येथील बाळासाहेब ठाकरे चौकात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, मी जबाबदारी बोलतो,सत्ताधारी मंडळींनी जाणीवपूर्वक हा नियमितीकरनाचा प्रश्न तांत्रिक अडचणीत अडकवलेला होता.जो कधी सुटूच नये.त्या तांत्रिक अडचणी आम्ही दूर केल्या. परिणामी घरे नियमितीकरणाचा मार्ग मोकळा झाला. आपल्याला आपली स्वतःची,हक्काची घरे मिळणार या आनंदा प्रित्यर्थ या लोकांनी साखर पेढे वाटून आनंद साजरा केला. मग साखर वाटणारी गरीब जनता मुश्रीफांना अडाणी वाटते का?मी नम्रपणे सांगतो, हे श्रेय माझे एकट्याचे नसून सर्व मिळकतधारक, यासाठी कष्ट घेणारे कार्यकर्ते यांच्यासह राज्य सरकारचे आहे. याऊलट ज्यांच्यामुळे हा प्रश्न तीस वर्षे रेंगाळला आहे ते विरोधक मात्रतातडीने सभा घेऊन हे काम आपणच केल्याचा कांगावा करत आहेत हेच त्यांचे मोठे अपयश आहे. या निमित्ताने मी येथे लोकांना सांगतो, विरोधक हे काम आम्हीच केले म्हणून सांगतील त्याकडे लक्ष देऊ नका. आता ही घरे लवकरच तुमच्या नावावर होण्यामध्ये कोणतीच अडचण राहणार नाही. यावेळी नवोदिता घाटगे म्हणाल्या, प्रत्येक महिलेला त्यांचे स्वतःचे घर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे .मागील नगरपालिका निवडणुकीवेळी काही महिलानी ही घरे आमच्या नावावर नाहीत ही व्यथा आम्हाला बोलून दाखवली होती. माझ्या मनाला ही बाब टोचत होती. मी समर्जीत राजेंच्याकडे महिलांची ही मागणी उचलून धरली दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.
पुन्हा यामध्ये अडीच वर्षे गेली. राजेंच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटला ” करने की इच्छा हो तो कुछ भी हो सकता है “ हे यातून सिद्ध होते. माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले, सामाजिक कार्यात तुमचे आमचे मतभेद झाले ,आम्ही स्वग्रही आलो. तुमचे काही घेऊन नाही आलो यात गद्दारी कसली ? राहिला प्रश्न स्वताच्या भावजयना थांबूवून आम्हाला नगराध्यक्ष केले. असे म्हणता. आमची उमेदवारी तुमच्या कुटुंबातील वैयक्तिक मतभेदातून झाली आहे. तुम्हाला तुमच्या भावजयींना पाडायचेच होते.
यावेळी मारुती मदारे, अरुण गुरव, उत्तम पाचगावे, संदीप शिंदे, सुरज भुरले, संदीप पसारे,वैष्णवी चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर राजे वीरेंद्रसिंह घाटगे माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, विवेक कुलकर्णी, शाहूचे संचालक बॉबी माने, सतीश पाटील, राजीव बॅंकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, राजेंद्र जाधव नगरसेविका विजया निंबाळकर, संभाजी नाईक उमेश सावंत, दीपक मगर, आदी उपस्थित होते.
चौकट
गोरगरिबांना स्वमालकीच्या जागा देणारे नेतृत्व पाहिजे की मोक्याच्या जागा हडपणारे नेतृत्व…
राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पूर्वजांनी कागलमधील अनेक गरजू नागरिकांना जागा दिल्या. मात्र त्यांच्या नावावर या जागा तीस वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी राजकीय हेतूने केल्या नाहीत. उलट त्यांनी शहरातील मोक्याच्या जागा लाटण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे गोरगरिबांना स्वमालकीच्या जागा देणारे नेतृत्व पाहिजे की मोक्याच्या जागा हडपणारे नेतृत्व पाहिजे. याचा नागरिकांनी विचार करावा. असे परखड मत उत्तम पाचगावे यांनी व्यक्त केले.
