
मुंबई : ‘महाराष्ट्रात आधीच्या सरकारच्या काळात विकासकामे रोखण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे विकास खुंटला होता. मात्र, आता ‘डबल इंजिन’ सरकारमुळे मुंबईचा विकास होत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केले.

‘देश आणि राज्याबरोबरच मुंबई महानगरपालिकेतही समर्पित भावनेने काम करणारे सत्ताधारी असतील तर येत्या काही वर्षांत मुंबईचा कायापालट होईल,’ असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी पालिकेची सत्ता भाजपच्या हातात देण्याचे अप्रत्यक्ष आवाहनच मुंबईकरांना केले.वांद्रे- कुर्ला संकुलात सुमारे ४० हजार कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ, तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणिशग फुंकले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आणि फेरीवाले व छोटय़ा दुकानदारांना पंतप्रधान स्वनिधी योजनेतून अनुदान वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे स्वरूप शासकीय समारंभाचे असले तरी, मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.