
चंदीगड : चंदीगड पोलिसांनी भारतीय हॉकी संघाचा माजी स्टार खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

चंदीगडच्या एसपींची भेट घेतल्यानंतर महिला प्रशिक्षकानं क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली होती. आता मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंदीगड येथील सेक्टर 26 पोलिस स्टेशनमध्ये कलम-354, 354A, 354B, 342, 506 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2022 रोजी लेडी कोचनं चंदीगड पोलीस मुख्यालयात जाऊन एसएसपींची भेट घेतली आणि तिची तक्रार नोंदवली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासासाठी 26 पोलिस स्टेशनला पाठवलं होतं. आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महिला प्रशिक्षकाच्या आरोपांचं खंडन केलंय.
