डी वाय पाटील ग्रुपकडून कोणतीही थकबाकी नाही – शिवाजी भोसले

कोल्हापूर : डी.वाय. पाटील ग्रुपच्या कोणत्याही मालमत्तेचा घरफाळा थकीत नाही. केवळ राजकीय द्वेषातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून वारंवार ग्रुपवर धादांत खोटे आरोप केले जात आहे.याबाबत महानगर पालिकेकडून माहिती घेतल्यास आमच्याकडून कोणतीही थकबाकी नसल्याचे स्पष्ट होईल, अशी माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे इस्टेट मॅनेजर शिवाजी भोसले यांनी दिली.

डी. वाय. पाटील ग्रुपची प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. कोणतीही निवडणूक आली की उठसुठ पत्रकार परिषदा घेऊन आरोप करत सुटायचे हेच यांचे काम आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणूकी आधीही विरोधकांनी आमच्यावर थकबाकी संदर्भात खोटे आरोप केले होते. मात्र, त्यातील फोलपणा सिद्ध झाला आहे.

कोल्हापूर महापालिकेनेही डी. वाय. पाटील ग्रुपच्या मालमत्तेची थकबाकी नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत 16 मार्च 2022 रोजी महापालिकेने लेखी पत्र दिले असून त्यात डी. वाय. पाटील ग्रुपच्या सर्व मालमत्ताचा 2021-22 पर्यंतचा सर्व घरफाळा भरण्यात आलेला असल्याचे व कोणतीही थकबाकी नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र, तरीही केवळ राजकीय बदनामीच्या हेतूने वारंवार आमच्या ग्रुपवर खोटे व दिशाभूल करणारे आरोप होत आहेत. कोल्हापूरची जनता अतिशय सुज्ञ आहे. कोल्हापूरच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रात डी. वाय. पाटील ग्रुपने दिलेले योगदान सर्वानाच ज्ञात आहे. महानगरपालिकेकडे घरफाळा बाबतची माहिती घेतल्यास विरोधकांचे आरोप बिनबुडाचे व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट होईल, असे शिवाजी भोसले यांनी स्पष्ट केले.

🤙 8080365706