
नागपूर : सत्ताधारी पक्षच अधिवेशन गाजवत आहे, विरोधी पक्ष नेते अजित पवार आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. हा आरोप भाजप नव्हे तर मविआतील आमदार दबक्या आवाजात विधीमंडळ परिसरात करताना दिसत आहेत.

महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता सरकारला सळो की करणारा असावा. मात्र, अजित पवार यांनी पावसाळी आणि हिवाळी दोन्ही अधिवेशनात कुठल्याही प्रकारे सरकारला घेरण्याचे प्रयत्न केलेले नाहीत. यामुळे राष्ट्रवादीसह अन्य पक्षीय नेत्यांनीही दादांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विधीमंडळ आवारात आमदारांमध्ये दबक्या आवाजात ही चर्चा आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनावरुन सरकारला धारेवर धरण्याची गरज होती. मात्र, यावेळी बॅटींग करण्यासाठी ३२ वर्षांचे आदित्य ठाकरे, स्वतः जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे नेते पुढे आले. स्वतः अजित पवार यांनी कुठल्याही प्रकारे आक्रमक भूमिका घेतलेली नाही. उलट विधानसभा अध्यक्षांपुढे दिलगीरी व्यक्त केल्याने स्वतःच्याच पक्षातील नेत्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यानंतर आता स्वतः शरद पवारांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन सर्वच नेत्यांनी सरकारला घेरावे, अशी रणनिती ठरविण्यात आली आहे.अजित पवार यांनी विधानसभेत घेतलेल्या नरमाईमुळे आता राष्ट्रवादीने रणनिती बदलली आहे. महत्वाच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतील नेतेमंडळी शुक्रवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत.पावसाळी अधिवेशनावेळी मोहित कम्बोज यांनी ट्विट करत सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचे संकेत दिले होते. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनीही अजितदादांसाठी बॅटींग केली होती. मात्र, त्यानंतर सरकारविरोधातील अजितदादांचा आवाज तितकासा आक्रमक दिसला नाही.
