
कोल्हापूर : राज्यातील पशुधनाच्या लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ३० हजार पशुधनामागे एक पशुधन विकास अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र असून, राज्य सरकारने पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. पशुसंवर्धन विभागातील पदे रिक्त असल्यामुळे लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यात अडथळे निर्माण होत आहेत. जनावरांच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे जनावरांना वैद्यकीय मदत मिळण्यास गैरसोय होत असल्याकडे आमदार सतेज पाटील राज्य सरकारचे लक्ष वेधत हा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला.
राज्यातील ३५५ पैकी २७२ तालुक्यांमध्ये लम्पी प्रादुर्भावामुळे ४ हजार गोवंशीय पशुधन मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील मंजूर ४ हजार ९५१ पदांपैकी सद्य:स्थितीत ३ हजार १४९ पदे भरलेली असून पशुवैद्यकीय अधिकारामुळे १८०२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. विशेषत: सांगली जिल्ह्यात २३१ आणि आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५४ पशुधन अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ३० हजार पशुधनामागे एक पशुधन विकास अधिकारी कार्यरत असल्याने ९० पशुवैद्यकीय दवाखान्यात केवळ २९ पशुधन विकास अधिकारी कार्यरत असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले. त्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवरील सेवा रद्द करुन त्यांना मूळ पदावर सेवेत रुजू करुन घेणे आवश्यक असल्याचा मुद्दाही आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. तसेच लम्पी आजाराने पशुधन मृत्यूमुखी पडलेल्या पशुपालकांना शासकीय मदत तातडीने मंजूर करण्यात यावी यामधील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात अशी आग्रही भूमिका आमदार पाटील यांनी मांडली.
