
सरूड: कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० गावांमध्ये ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शाहूवाडी-चनवाड या गावात मात्र निरव शांतता आहे. शासन निर्णयाप्रमाणे येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले नसल्याने येथील ग्रामस्थांनी प्रारंभापासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे.
ग्रामस्थांना विश्वासात न घेता किंबहुना त्यांचा हा विरोध दुर्लक्षित करून प्रशासनाने येथील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम एकतर्फी लादल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीने केला आहे.‘ग्रामपंचायत नको नगरपंचायत हवी’ असा नारा देत येथील राजकीय गटातटात विभागलेल्या कार्यकर्त्यांसह सर्वच ग्रामस्थांनी या निवडणुकीसाठी प्रशासनाशी असहकार पुकारून एकीचे दर्शन घडविले आहे. अर्थातच शाहूवाडीकरांनी ‘आर या पार’च्या इराद्याने नगरपंचायतची मागणी उचलून धरल्याचे स्पष्ट दिसत आहे.
